
मी कुठलंही वचन दिलं नव्हते, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, माझी सर्व भाषणे तपासा, त्यात उद्धव ठाकरेंसमक्ष आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढतोय हे जाहीर केले होते.पूर्ण निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंनी कुठेही त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनेल असं विधान केले नव्हते असा दावा भाजपा नेते अमित शाह यांनी केला.अमित शाह म्हणाले की, उद्धव ठाकरे आज ज्यांच्यासोबत बसलेत ते मुस्लीम पर्सनल लॉ आणू इच्छितात. वर्षोनुवर्षे ज्यांनी राम मंदिराचा विरोध केला. तिहेरी तलाक पुन्हा परत आणायचं आहे. उद्धव ठाकरे कुणासोबत बसलेत हे महाराष्ट्रातील जनता जाणते. शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण कायम अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पुत्रमोहामुळे प्रादेशिक पक्षात फूट पडली. महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने जातंय. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना १५ वर्ष महाराष्ट्राचं नुकसान झालं. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र मागे पडला होता असं त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील जनतेनं भाजपाला संधी दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, या सरकारने महाराष्ट्राला पुढे आणण्याचं काम केले. परंतु उद्धव ठाकरेंनी सर्व विचारधारा सोडून निवडणुकीनंतर युतीला दगाफटका करत मुख्यमंत्री बनण्यासाठी, हिंदुत्व सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाशी गेले. बाळासाहेबांच्या विचारावर पक्ष ओळखला जातो, हे विचार कोण पुढे घेऊन जाते हे लोकांना माहिती आहे. भाषणाच्या सुरुवातीला हिंदू शब्दही आता बोलला जात नाही. औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगर हे बाळासाहेबांनी सांगितले होते. त्यालाही काँग्रेसचा विरोध होता असं अमित शाह यांनी म्हटलं. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते.सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पक्ष चालणार नाही याची जाणीव शरद पवारांना आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची भाषा आतापासून करतायेत असं सांगत अमित शाह यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.