Latest Marathi News
Ganesh J GIF

अजितदादा गटाने मावळमध्ये माझा ताकदीने प्रचार केला नाही – श्रीरंग बारणेंनी बोलून दाखवलं!

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, त्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप करत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

मावळ लोकसभेत महायुतीत खदखद होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही, अशी कबुली महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दिली. मात्र, तरीही मावळमध्ये माझा 2 लाख 50 हजार 374 मतांनी विजय होईल, असा दावा श्रीरंग बारणे यांनी केला. त्याचवेळी माझा प्रचार न करणाऱ्यांची नावं मी अजित पवार यांच्याकडे दिल्याचे बारणे यांनी सांगितले. अजित पवार गटाने माझा शंभर टक्के प्रचार केला असता तर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे डिपॉझिट जप्त झालं असतं, असा दावा श्रीरंग बारणेंनी केला. यापूर्वी संजोग वाघेरे यांनीही 1 लाख 72 हजार 704 मतांनी माझा विजय होईल, असा दावा केला होता. मात्र, श्रीरंग बारणे यांनी हा दावा खोडून काढत आपल्या विजयाचं गणित मांडलं. यावर आता महायुती आणि मविआच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.

श्रीरंग बारणे यांनी मावळमध्ये आपला विजय कसा पक्का आहे, हे सांगताना संपूर्ण आकडेवारीच मांडली. त्यांनी म्हटले की, मावळच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. या मतदारसंघात पनवेल आणि पिंपरी चिंचवड शहर ही दोन मोठी महानगरं आहेत. याठिकाणी महायुतीला मानणारा मोठा वर्ग आहे. याठिकाणी उबाठा गटाची ताकद नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या 3 लाख 22 हजार मतांपैकी मला दोन लाख मतं पडतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 1 लाख 80 हजार मतदान पडले. या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही, असा दावा श्रीरंग बारणे यांनी केला.

अजित पवार यांनी मावळमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. अजितदादा गटाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं. पण काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. याची लिस्ट मी अजित पवारांकडे दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 100 टक्के काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते, असेही बारणे यांनी म्हटले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!