
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता अखेरचे २ टप्पे उरले आहेत. ४ जूनला निकालात भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा विरोधकांकडून केला जातोय.तर एनडीए पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा सत्तास्थापन करेल असा विश्वास भाजपा नेते करत आहेत. त्यातच महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात उद्धव ठाकरे निकालानंतर मोदींसोबत जातील अशी चर्चा सुरू झाली. प्रकाश आंबेडकरांनीही हाच दावा केला. याच चर्चेवर शरद पवारांनी थेट भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, निकालानंतर कुठले पक्ष भाजपासोबत जातील हे मी सांगू शकत नाही. पण महाराष्ट्रासारखी परिस्थिती देशात निकालानंतर आली तर आमच्यासारखे लोक समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम बनवून जर संधी असेल तर त्याचा पूरेपूर फायदा घेऊ. उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील याची अजिबात शक्यता नाही. अजिबातच नाही. उद्धव ठाकरे भाजपा आणि मोदींसोबत जाणार नाहीत, नाहीत नाहीत असं तीनदा पवारांनी स्पष्ट केले. पत्रकार प्रशांत कदम यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच भाजपानं ७५ वर्षाची वयोमर्यादा पक्षात ठेवलीय त्यात ते आतापर्यंत प्रामाणिक दिसतायेत. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना बाजूला केले. त्यामुळे वयाचे सूत्र वापरून ज्येष्ठ सहकाऱ्यांना बाजूला केले. तेच मोदींनाही लागू पडेल. या तिघांबाबत जो निर्णय घेतला गेला, तो मोदींबाबतही आज ना उद्या घेतला जाईल. केजरीवाल म्हणतात, त्याप्रमाणे पुढचा पर्याय कोण याचा विचार भाजपाला करावा लागेल. याचा फायदा अमित शाह घेतील असं केजरीवाल सांगतात, माझ्याकडे माहिती नाही. केजरीवालांनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो उद्या निघेल तेव्हा पाहू असंही शरद पवारांनी पंतप्रधानपदाबाबत सांगितले.
राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे, पक्ष हायजॅक केला गेला हे आम्ही पटवून देतोय. निवडणूक तोंडावर होती म्हणून आम्ही जास्त पाठपुरावा घेतला नाही. आता पक्ष, पक्षाचा अधिकार, पक्षाचे चिन्ह आम्ही आग्रहाने सुप्रीम कोर्टात मांडू. आमच्यातला आणखी एक वर्ग तुतारीच चांगली असं म्हणतायेत. तुतारी आम्ही फक्त १० मतदारसंघात म्हणजे ६० विधानसभा मतदारसंघात घेतलीय. २८८ मतदारसंघाबाबत जास्त काय सोयीचे होईल त्याबाबत आम्ही सध्या विचार केला नाही असं सांगत शरद पवारांनी घड्याळ की तुतारी यावर स्पष्टीकरण दिले आहे.