Latest Marathi News
Ganesh J GIF

पबसारख्या घाणेरड्या संस्कृतीला हद्दपार करा, धंगेकरांचे देसाईंना प्रत्युत्तर

‘माझ्यावरील कायदेशीर कारवाईचे सोडा, तुम्ही आधी पुणेकरांची माफी मागा, कारण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा वारसा पब संस्कृतीने बिघडवला आहे व तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात’ अशा तिखट शब्दांमध्ये काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना प्रत्युत्तर दिले.’तुमची मुलगीही पुण्यात शिकत आहे, मग पालक म्हणून तरी या घाणेरड्या संस्कृतीला हद्दपार करा’ असा सल्लाही धंगेकर यांनी दिला.

मंत्री देसाई यांनी गुरूवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन धंगेकर यांना दोन दिवसात माफी मागा अन्यथा कायदेशीर नोटीस पाठवू व बदनामीचा खटला दाखल करू असा इशारा दिला होता. धंगेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी देसाई यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मला धमकी देऊ नका, त्याऐवजी पुणेकरांची माफी मागा. कल्याणीनगर अपघातानंतर पुण्यात ५० पेक्षा जास्त पब बंद करण्यात आले, याचा अर्थ ते अनिधकृत सुरू होते. मग ज्या खात्याचे तुम्ही मंत्री आहात, त्या खात्याचे आयुक्त चरणसिंग राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करा, कारण इतके दिवस ते काय झोपा काढत होते का?

पुण्यात लाखो विद्यार्थी घरदार सोडून शिक्षणासाठी म्हणून येतात. अशा अनेक मुलांना पब संस्कृतीने विळख्यात घेतले आहे. पुण्याचा वारसाच या संस्कृतीने बदनाम केला आहे. याच्यासाठी काय करणार ते पुणेकरांना सांगा. तुम्हीच पुण्याचे खरे गुन्हेगार आहात, अशा शब्दांमध्ये धंगेकर यांनी देसाई यांच्यावर हल्ला चढवला. माझ्यावर हक्कभंग दाखल करत आहात तर करा, मी तुमचे बरेच काही भंग करेल. मी बोलायला लागलो तर सगळे तुमच्यापर्यंत येऊन थांबेल, असा इशाराही धंगेकर यांनी देसाई यांना दिला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!