
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काही धक्कादायक निकाल समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. बारामती, शिरूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, मध्ये मविआचे उमेदवार आघाडीवर आहेत.तर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय यांच्यात लढत आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे 21622 मतांनी आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांची थेट लढत असून या जागेवर शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आघाडी कायम राखलीय. शिरूरमध्ये अमोल कोल्हे ३३ हजार २०० मतांनी आघाडीवर असून शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी ११ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी जोरदार लढत दिलीय. मोहोळ यांना ९९ हजार तर धंगेकरांना ८८ हजार मते मिळाली आहेत.कोल्हापुरात काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक पाचव्या फेरीअखेर २५ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
हातकणंगले मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी जवळपास ४ हजार मतांची आघाडी घेतलीय. शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर राजू शेट्टी ४० हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत.साताऱ्यात चौथ्या फेरीअखेर हाती आलेल्या निकालानुसार भाजप उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसत असल्याचं दिसतंय. उदयनराजे पिछाडीवर असून शशिकांत शिंदे यांनी चौथ्या फेरीअखेर ९ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे 21397 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे (शिंदे गट) : 133614, संजोग वाघेरे (ठाकरे गट) : 112217 सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी भाजप आणि शिवसेना उबाठाच्या उमेदवारांना जोरदार दणका दिला आहे. पहिल्या फेरीपासून त्यांनी आघाडी घेतली असून पाचव्या फेरीअखेर विशाल पाटील 23 हजार 250 मतांनी आघाडीवर आहेत.सोलापूरमध्ये भाजप उमेदवार राम सातपुते पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी १० हजार मतांनी आघाडी घेतली आहे.