
पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होती.आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ यांनी ३७ हजार ६९३ मतांची लीड घेतली आहे. त्यामुळे पुण्यातील भाजपा कार्यलयात तसेत मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्ते जमा होत आहेत. तसेच काही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला आहे. तर काँग्रेस भवन परिसरात शुकशुकाट पसरला आहे. काँग्रेस उमेदवार आमदार रवींद्र धंगेकरांना त्यांच्या कसबा मतदारसंघातही अपेक्षित प्रतिसाद भेटला नसल्याचे दिसते. कारण सध्या मोहोळ यांना कसबा मतदारसंघातून लीड मिळाली आहे. तर शेवटच्या अपडेटनुसार मुरलीधर मोहोळ ४५ हजारांनी आघाडीवर आहेत.
पुण्यातील निवडणूक ही नगरसेवकांची निवडणूक संबोधली जात होती. कारण या मतदारसंघात उभारलेले प्रमुख उमेदवार हे यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र धंगेकर तसेच माजी नगरसेवक आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांचा उल्लेख केला पाहिजे. मोरे यांना पुणेकरांना नाकारलेले दिसत आहेत. मोहोळ आणि धंगेकरांना जेवढी मते मिळत आहेतत त्याच्या जवळपासही मोरे नाहीत.
मुरलीधर मोहोळांना मिळालेला लीड तोडणे धंगेकरांना खूप अवघड जाणार आहे. सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ यांनी ३७ हजार ६९३ मतांची लीड घेतली आहे. त्यामुळे आता पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस भवन आणि रवींद्र धंगेकरांच्या कार्यालयाजवळ शुकशुकाट पसरला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात वडगाव शेरी २ लाख ४१ हजार ८१७, शिवाजीनगर १ लाख ४१ हजार ११३, कोथरूड २ लाख १७ हजार ४५५, पर्वती १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंट १ लाख ४९ हजार ९८४, तर कसबा मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदान झाले आहे.पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे.