
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं 400 पारचं स्वप्न भंगलं आहे. दुपारी 1.30 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 239 जागांवर आघाडीवर आहे तर एनडीएचे मिळून 293 उमेदवार आघाडीवर आहेत.दुसरीकडे इंडिया आघाडी 231 जागांवर आघाडीवर आहे यात काँग्रेसकडे 97 जागांची आघाडी आहे. भाजपचा 400 पारचा नारा अपयशी ठरत असल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे, एवढंच नाही तर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, एनडीएला मोठा धक्का बसला आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला होता. पण 250 जागांच्या जवळपास भाजपची गाडी थांबली आहे. तर इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून 230 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘तुम्ही आपणच सगळ्यात भारी असल्याचा दावा केला होता. पण आता भावी पंतप्रधान माजी पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामाा द्यावा, हाच निवडणुकीचा संदेश आहे’, अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रामध्येही महायुतीला मोठा धक्का बसताना दिसत आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी महायुती 19 जागांवर तर महाविकासआघाडी 29 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 10 जागांवर, शिवसेना 7 जागांवर, राष्ट्रवादी एका जागेवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे काँग्रेस 12 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 9 जागांवर तर शरद पवारांची राष्ट्रवादी 8 जागांवर आघाडीवर आहे.