
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. “मी पुन्हा येईन… पुन्हा येईन..लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फ़ोडून सांगणारे आता : मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा, अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान… महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. जय महाराष्ट्र!” असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
संजय राऊतांच्या या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्रजींच्या रेकॉर्डची चिंता तुम्ही करू नका. तुमचा रेकॉर्ड रसातळाला गेलं ते पाहा” असं म्हणत पलटवार केला आहे. तसेच “भाजपाची साथ सोडून पायांवर कुऱ्हाड मारून घेतलीत पण तरीही लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे तुम्ही आधुनिक शकुनी शोभता खरे..” असंही म्हटलं आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
“सर्वज्ञानी… संजय राऊत. ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’सारखं दुसऱ्याच्या वरातीत नाचण्यात तुमचा हातखंडा आहे… देवेंद्रजींच्या रेकॉर्डची चिंता तुम्ही करू नका. अडथळ्यांवर मात करून पुढं जाण्याचं त्यांचं रेकॉर्ड आहे. तुमचा रेकॉर्ड रसातळाला गेलं ते पाहा… भाजपाची साथ सोडून स्वत:च्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेतलीत आणि निम्म्यावर घसरलात पण तरीही लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे तुम्ही आधुनिक शकुनी शोभता खरे..!” असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची महाराष्ट्रात झालेल्या पिछाडीची मी जबाबदारी स्वीकारतो. आपण स्वत: कुठेतरी कमी पडलो. ती कमतरता भरून काढण्यासाठी व विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असून, मला सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शविली आहे. फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेऊ नये, यासाठी भाजप नेत्यांकडून त्यांना गळ घालती जात आहे.