लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आलीय.तसेच सर्वच पक्ष एकमेकांविरोधात दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत. अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेबाबत काँग्रेसने मोठा दावा केला आहे.महिन्याभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ४० आमदारांची घरवापसी होणार असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. वारे महाविकास आघाडीच्या बाजूने वाहत आहेत असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. वडेट्टीवार यांच्या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे.
“या आमदारांना आता बोलायला जागा नाहीत. ही सगळी गद्दारीचा शिक्का लागलेली मंडळी आहेत. हे गेले आहेत तर परत काही येऊ शकत नाही. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पुढच्या महिन्याभरात अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे गेलेले ४० आमदारांची घरवापसी होईल. अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. ते त्यासाठी संपर्क साधत असल्याची माहिती देखील आहे. वस्तुस्थिती काय आहे हे मला माहिती नाही. पण ही चर्चा मात्र जोरात आहे. हे होण्यामध्ये कुठलीही अडचण मला दिसत नाही. कारण वारे महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहेत,” असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. विजय वडेट्टीवार हेच भाजपच्या वाटेवर आहेत, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत दस्तुरखुद्द विजय वडेट्टीवारचं भाजपच्या वाटेवर..! असं म्हटलं आहे. त्यामुळे आता नेमका खरा दावा कुणाचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.