Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकसभेत धुव्वा उडाला, आता मनोज जरांगे यांचा महायुतीला दुसरा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षण आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. काल रात्री त्यांची तब्येत बिघडली होती.त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली. एका मंत्र्याच्या सांगण्यावरून त्यांनी ही सलाईन लावली. मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेण्याचं आश्वासन दिल्यानेच आपण सलाईन लावली. आज संध्याकाळपर्यंत याबाबत काय ते कळेल. नाहीच काही झालं तर सलाईन फेकून देऊ, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आमच्याकडे दुर्लक्ष केल्यास लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही दहापट फटका बसेल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी महायुतीला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. राज्य सरकारने मागेही 17 दिवस आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं होतं. आताही दुर्लक्ष करतील. लोकसभेला फटका बसला म्हणून दुर्लक्ष केलं तर यापेक्षा दहापट फटका विधानसभेला बसेल. आम्ही उमेदवार दिला नाही तर एका एकाची जिरवल्याशिवाय सोडणार नाही. समाजाचा छळ केला तर आम्हीही वस्ताद आहोत. माझ्याशिवाय समाजाचं पानही हलत नाही. आम्ही खंबीर आहोत. आम्हाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आरक्षण द्या. पण तुम्ही मजा बघणार असाल तर तुम्हाला विधानसभेतून आऊट करू. आम्ही फक्त सावध करतोय, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

जोपर्यंत काम होत नाही, विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास नाही. गेल्या 10 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवत आहे. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी पाच महिन्यापासून झालेली नाही. एवढा वेळ थोडाच लागतो. आम्ही सलाईन कुणाच्या शब्दाला मान ठेवून लावली ते जाहीरपणे सांगू. निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू तर करा. नाही केली तर आम्ही नाव घेऊन सांगू. आरक्षणाबाबत आज संध्याकाळपर्यंत कळेल. नाही कळालं तर सलाईन काढून फेकू. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो असं एका मंत्र्याने रात्री सांगितलं. त्यांच्या शब्दाला मान दिला. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवूच नये का? शेवटी निर्णय घेणारे तेच आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, असं मनोज जरांगे म्हणाले.

आमदार राऊत हे फक्त निरोप घेऊन आले होते. कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, कुणाचाही असो मला कुणाशी घेणंदेणं नाही. 10 महिन्यापासून कोणीही येतं. मध्यस्थी करतं. चर्चा तर झालीच पाहिजे म्हणून मी चर्चा करतो. सरकारने हा विषय तडीस नेतो असं सांगितलं. त्यामुळे मी सलाईन घेतली. पण सरकार बदललं तर मी पुन्हा सलाईन काढेल, असंही ते म्हणाले.सरकारला यायचं तर येईल. आमचे दरवाजे उघडे आहेत. आरक्षण हा आमचा विषय आहे. आमच्या मुलांना कॉलेजात प्रवेश मिळावा. आमच्या लोकांना कुणबीप्रमाणपत्र द्यावं. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी. मराठा आणि कुणबी एकत्र आहे. त्याला आधारही मिळाला आहे. सरकार काय करते ते पाहू. माझं काम लढायचं आहे. मी लढत आहे. आमच्यावर जाणूनबुजून गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घ्यावे. राज्यातील मराठा तरुणांवरील गुन्हेही मागे घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!