
राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेला उद्या, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील 17 हजारांहून अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.त्यानुसार 17 लाखांहून अधिक अर्ज सरकारला प्राप्त झाले आहेत. या स्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (एनसीपी एसपी) आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त करताना ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस विभागाकडून अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये बँड्समन पदातील 41 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या 41 जागांकरिता तब्बल 32 हजार 26 अर्ज मिळाले आहेत. तर, तुरूंग विभागातील शिपाई या पदाच्या 1800 जागांसाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालकपदाच्या 1 हजार 686 जागा रिक्त असून यासाठी एकूण 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. पोलीस शिपाईपदाच्या सर्वाधिक जागा रिक्त आहेत. या 9 हजार 595 जागांसाठी तब्बल 8 लाख 22 हजार 984 अर्ज प्राप्त झाले आहेत. शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी 3 लाख 50 हजाप 592 इच्छुक आहेत.
यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत असून 17 हजार 471 पदांसाठी 17.76 लाख अर्ज म्हणजेच एका जागेसाठी तब्बल 101 अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये डॉक्टर्स, इंजिनीयर, वकिलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश असून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण 40 टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये चूक कोणाची? इंजिनियरिंग, डॉक्ट, वकिली यासारखे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही म्हणून पोलीसभरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांची की युवकांना रोजगार उपलब्ध न करू शकणाऱ्या व्यवस्थेची? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. पण दुर्दैवाने आपल्या प्रगत महाराष्ट्रात याची चर्चा होणार नाही, कारण हे विषय सर्वसामान्यांचे गोरगरिबांच्या पोरांचे आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, यावर मात्र आज जोरदार चर्चा होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. आज सर्वच राजकीय पक्षांनी खऱ्या अर्थाने चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यांचेही विषय कधीतरी मुख्य चर्चेत येतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.