
मंगळवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यांनतर आज (ता. 19 जून) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “भाजपच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात अपयश आले.याचे कारण काय, याचे आम्ही चिंतन करूच शिवाय, जिथे आम्ही कमी पडलो तिथे अधिकचे काम करू. तसेच, ज्यांनी आम्हाला मते दिली आणि ज्यांनी आम्हाला मते दिली नाहीत, अशा सगळ्यांचे आभार मानण्यासाठी राज्यभर आभार धन्यवाद यात्रा काढणार आहोत. तसेच, पुढील पाच वर्षांसाठी आम्ही योजना तयार करत आहोत.” अशी माहिती दिली.
चंद्रशेखर बावनकुळे यांना शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टिकेबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी एक शब्द बोलले, की तुम्ही टीका करता. गेल्या दीड वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली, याची महाराष्ट्राच्या जनतेने नोंद घेतली आहे. थोड्याश्या यशाने हुरळून निघालेले आहेत. शरद पवारांनी महाविकास आघाडीने मोदींवर किती खालच्या भाषेत टीका केली आहे याचा अभ्यास करावा. एकदा मोदींनी टीका काय केली, ती तुम्हाला एवढी लागली मग महाविकास आघाडीने मोदींवर काय काय टीका केली, याचे आकलन शरद पवारांनी करावे.” असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
पुढे बावनकुळे म्हणाले की, ” देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी, अशी विनंती केली आहे. त्यांनी ती विनंती मान्य केली. तसेच, केंद्रीय नेतृत्वानेदेखील आमची विनंती मान्य केली. महायुती सरकार लोकांसाठी काम करेल यासाठी त्यांनी सरकारमध्ये असणे आवश्यक आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांबद्दल मी असे म्हणेल सर्वांनी चांगले काम करायचे आहे.” असे ते म्हणाले, तसेच, छगन भुजबळ यांनाच विचारावे लागेल त्यांची नाराजी काय? त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही मत व्यक्त करणे हे योग्य नाही, असे ते म्हणाले. मराठा आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही भूमिका आमची आहे.”
पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना एकनाथ खडसेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “एकनाथ खडसे अजून भाजपमध्ये नाहीत. जेव्हा भाजपामध्ये येतील तेव्हा बघू. आमचे प्रभारी अश्विनी वैष्णव येतील तेव्हा त्याबद्दल चर्चा होईल.” असे मत त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी नाना पटोले यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, “नाना पटोले इतक्या खालच्या ठरला गेले आहेत, की ते शेतकऱ्यांकडून पाय धुवून घेत आहेत. या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला आहे. ब्रिटिश सरकारच्या काळ काँग्रेसने आणला असून या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. नाना पटोलेंनी पदाचा अपमान केलेला असून त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण 21व्या शतकात जगतो आहोत. त्यामुळे काय संदेश समाजाला दिला पाहिजे? हे कळायला हवे.” अशा शब्दात त्यांनी टीका केली.