पुण्यातील पोर्शे कार अपघाताची दाहकता ताजी असतानाच आता मुंबईतील वरळीतही आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. धडकेनंतर बीएमडब्ल्यू कारने महिलेला काही अंतर फरफटत नेल्याने ती गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.तर महिलेच्या पतीने वेळीच उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला आहे. अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कार मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा होता. या अपघाताच्या घटनेनंतर मिहीर शहा फरार झाला असून पोलिसांनी चौकशीसाठी राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील अँट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला आहे. मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात नाकवा हे कोळी दाम्पत्य वास्तव्यास होते. हे दाम्पत्य आज सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला गेले होते. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना नाकवा यांच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू कारने धडक दिली.त्यानंतर दोघेही कारच्या बोनेटवर पडले. पतीने वेळीच प्रसंगावधान दाखवत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली.पण महिला मात्र कारसोबत फरफटत गेली.अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु तिथे डॉक्टरांनी सदर महिलेला मृत घोषित केले.
बीएमडब्ल्यू कारमध्ये असलेला मिहीर शहा आणि चालक हे दोघे फरार असून मिहीरचे वडील शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच मिहीर याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी गोरेगावमधून ताब्यात घेतलं आहे.घटनेनंतर मिहीर याचा फोन सध्या बंद आहे.पोलिसांनी या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला असून फरार असलेल्या मिहीर शहाचा शोध घेतला जात आहे.