
6 सेकंदात मृत्यू! चेकआऊट करण्याआधी हॉटेलच्या रुममध्ये शिरली अन् क्षणात कोसळली बॅक मॅनेजरची पत्नी, CCTV ने खळबळ
लग्नाच्या तीन महिन्यानंतरच एका बँक मॅनेजरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुस्कान सिमौलिया असं २८ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तिच्या वडिलांनी बँक मॅनेजर असणाऱ्या पती निलेशवर हत्येचा आरोप केला आहे. २४ ऑक्टोबरला ही घटना समोर आली. उत्तर प्रदेशातील झाशी इथं एका हॉटेलमध्ये मुस्कानचा मृतदेह आढळून आला मुस्कान ही पती निलेशसोबत हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. पतीने दिलेल्या माहितीनुसार ती अचानक खाली कोसळली आणि मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करण्यात येतेय सध्या मुस्कानचा एक ४७ सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात तीन जण हॉटेलच्या गॅलरीतून खोलीकडे जाताना दिसतायत. दोघे खोलीत जातात. तर मागून आलेली तरुणीही जाते. तेव्हा अचानक खोलीच्या दरावाजातून बाहेर फरशीवर पडताना दिसते.

घडलेल्या घटनेनंतर मुस्कानला तातडीने रुग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मुस्कानच्या वडिलांनी जावयावर हत्येचा आरोप केला आहे. २९ जूनला निलेशसोबत तिचं लग्न झालं होतं. मुलीने लग्नानंतर सांगितलं होतं की, निलेशचं आधीही लग्न झालंय आणि त्याची पहिली पत्नी इंदौरमध्ये राहते. यावरूनच निलेश मुस्कानला त्रास देत असे. हॉटेलमध्येही मुस्कानचं डोकं भिंतीवर आपटल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला. पोलिसांनी सांगितले की, महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली. तिथे तिचा पतीही होता. चौकशीत त्याने दोघेही हॉटेलमध्ये थांबल्याचं सांगितलं. सकाळी चेकआऊटवेळी अचानक पत्नी खाली पडली. त्याचे सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेतले आहे. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.


