”मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं”; खासदार कोल्हे अन् बजरंग सोनवणेंवर संतापले – मनोज जरांगे
राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा झाला असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे.त्यातच, विधिमंडळाच्या अधिवेशनातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. तर, संसदेतही खासदार अमोल कोल्हे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात जातीय जनगणना व्हावी, आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी खासदार कोल्हेंनी केली होती. आता, यासंदर्भात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी खासदार कोल्हे व बजरंग सोनवणेंना चांगलंच सुनावलं.
काही तृप्त आत्मे आमच्यातही आहेत, जे अभ्यासक आहेत, समन्वयक आहेत. या लोकांना मी समाजासाठी जे काम करतोय ते बघवत नाहीत, असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजातील काही जणांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, संसदेत खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणेंनी घेतलेल्या भूमिकेवरुन संताप व्यक्त केला. तसेच, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे जेव्हा संसदेत भाषण करतात, त्यामध्ये ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाला धक्का लागू नये. त्याचवेळी, बीडचे तुमचे खासदार बजरंग सोनवणे हेही बाक वाजवून त्याला समर्थन देतात? असा प्रश्न मनोज जरांगे यांना एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर, मनोज जरांगे यांनी खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणेंवरही जोरदार हल्लाबोल केला.
मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं, एकदा मतं घेतली की जात जागी झाली त्यांची. आमच्य मराठ्यांना हेच तर कळालं नाही, आता मराठ्यांचे डोळे उघडले आहेत, असे म्हणत अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला. तर, एखाद्याला मराठ्यांनी खासदार केलं, मग तो बदलला. 5 वर्षांसाठी त्याला वाटत असंल आता मला काही नाही. पण, आमदारकीला त्याच्या जीवाचे कोणी ना कोणी उभा करतील ना, मराठे ते पाडतील, असे म्हणत मनोज जरांगे यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, एखादी चूक होत असते, समाजाकडून होती, माझ्याकडूनही होत असते. काही चुका पोटात घेऊन माफ करावं लागतं, असेही जरांगे यांनी म्हटले.
यंदाच्या 18 व्या लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी संसद सभागृहात भाषण केले. त्यामध्ये, अमोल कोल्हे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरुनही भूमिका मांडली. त्यावेळी, महाराष्ट्रात जातीय जनगणना झाली पाहिजे, आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. यावेळी, राष्ट्रवादीचे बीडमधील खासदार बजरंग सोनवणे यांनी बाक वाजवून आपलं समर्थन दिलं होतं. बजरंग सोनवणेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.