आगामी विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये मुंबईत अधिक जागा मिळाव्यात असा ठाकरे गटाच्या नेत्यांचा सूर आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरु आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही आहे.महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबईत 36 पैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे रहाव्यात यासाठी ठाकरेंची शिवसेना विशेष प्रयत्न करणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत, तर 6 आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत अशा जागांसाठी ठाकरे गट आग्रही राहील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा क्षेत्रात ठाकरेंच्या उमेदवाराला अधिक लीड प्राप्त आहे, अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून लढवण्याच नियोजन करत असल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी गटाने उद्धव ठाकरेंची ताकद मान्य करुन त्यांना सर्वाधिक चार जागा दिल्या. लोकसभेच्या मुंबईत सहा जागा आहेत. मुंबईत मविआने चार जागा जिंकल्या. यात वर्षा गायकवाड यांच्या रुपाने काँग्रेसने एका जागा जिंकली. दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील निवडून आले.