
जळगाव दि ३०(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे महावितरणचे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
महावितरण विभागाचे कर्मचारी अक्षय महाजन हे अधिकाऱ्यांसह वीज चोरी करणारे आकडे काढण्यासाठी एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात गेले होते. यावेळी त्यांनी मनोज पाटील यांचा आकडा पकडला. पण ते ही कारवाई करत असताना पाटील यांनी महाजनवर दांडक्याने हल्ला केला. ते बचावासाठी धावले असता पाटील यांनी त्यांना पकडून, बेदम मारहाण केली. मारहाणीत महाजन यांना मोठी गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात वीजचोरी विरोधात महावितरणने कारवाईचे आदेश दिले आहेत. पण अलीकडे कर्मचाऱ्यांना विरोधात हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी देखील वेगवेगळ्या भागात कारवाईसाठि गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती.