(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – उरणमधील २० वर्षीय तरुणी यशश्री शिंदेच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. पोलिस तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या हत्या प्रकरणात टॅटूचा अँगल समोर आला आहे. यशश्री शिंदेच्या अंगावर दोन टॅटू होते. त्यापैकी एकावर दाऊदचं नाव होतं आणि ही बाब पोलीस रेकॉर्डवर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, यशश्रीच्या अंगावर दाऊद शेखच्या नावाचा टॅटू आढळून आला आहे. यशश्रीच्या काखेजवळ दाऊदच्या नावाचा टॅटू होता या वृत्ताला पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. यशश्रीच्या अंगावर दाऊद नावाचा टॅटू असल्याबरोबरच अन्य एक टॅटू असल्याचं बोललं जात आहे. मात्र टॅटू पोलिसांनी या दुसऱ्या टॅटूसंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. या टॅटूमुळे दाऊद आणि यशश्रीचे घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. यशश्री शिंदे हत्या प्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाऊदने यशश्रीला जेव्हा २५ जुलैच्या दिवशी भेटायला बोलवलं तेव्हा तो चाकू बरोबर घेऊनच आला होता अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी माध्यमांना दिली.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दाऊदच्या समोर यशश्रीच्या अंगावर हा टॅटू गोंदण्यात आला होता अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे, यशश्रीने स्वखुशीने टॅटू गोंदवला होता की, दाऊदने जबरदस्तीने हा टॅटू गोंदवायला भाग पाडले होते? शिवाय दुसरा टॅटू कोणाचा? याचा तपास केला जात आहे. हा टॅटू कोठे काढला, कोणी काढला आणि याबाबत पोलीस सखोल तपास करणार आहेत. त्यावरुन, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर आहे.