Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात अवघ्या ६०० रुपयांवरून मित्रानेच केली मित्राची हत्या!; आईवरून दिलेली शिवी अन् उसने दिलेले पैसे न परत केल्याचा राग

पुणे शहरात क्षुल्लक वादातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, चंदननगर परिसरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. हातउसने घेतलेले अवघे ६०० रुपये परत न केल्याने आणि वादाच्या भरात आईवरून अपशब्द वापरल्याच्या रागातून एका २२ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत राहुल आणि आरोपी आशिष हे दोघे जुने मित्र होते. आशिष हा एका नामांकित कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने मित्रत्वाच्या नात्याने राहुलला ६०० रुपये उसने दिले होते.,घरगुती गरजांसाठी आशिषने वारंवार पैशांची मागणी केली, मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता.

८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बोराटे वस्ती परिसरात दोघे समोरासमोर आले. तिथे पुन्हा एकदा ६०० रुपयांवरून त्यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू झाली. वाद विकोपाला गेला असताना संतापाच्या भरात राहुलने आशिषला आईवरून अत्यंत घाणेरडी शिवीगाळ केली. या शिवीमुळे आशिषचा रागाचा भडका उडाला. त्याने स्वतःवरील ताबा गमावत खिशातून धारदार चाकू काढला आणि राहुलवर एकापाठोपाठ एक सपासप वार केले.

हा हल्ला इतका भीषण होता की अतिरक्तस्राव झाल्यामुळे राहुलचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी घबराट पसरली.घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. तसेच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आशिष मगरला अवघ्या काही तासांत जेरबंद केले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!