(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – मुंबईत एक माणूस निव्वळ छंद म्हणून चोरी करायचा. एकाच चावीने तो बाईक्सचे लॉक उघडून त्या चोरून पसार व्हायचा. असं करत करत त्याने केवळ एक-दोन नव्हे तर तब्बल ८ दुचाकी चोरल्या. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून चोरीच्या आठही बाईक्स जप्त केल्यात.
साहील शेख असे आरोपीचे नाव असून रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी मंगळवारी त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी ग. द. आंबेकर मार्ग परिसरातून दुचकी चोरीची तक्रार आर ए के मार्ग पोलिसांना मिळली होती. प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर आणि पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि त्या आधाआरे चोरी करणाऱ्याची ओळख पटवली, तो आरोपी साहिल असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने लगेचच अँटॉप हिल येथील गांधीनगर येथे सापळा रचला आणि आरोपी साहिलला अटक केली.
चौकशीत त्याने केलेल्या खुलाशाने पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी साहिल याला बाईक्स चोरी करण्याचा छंद होता. केवळ छंद म्हणूनच तो या चोरी करायचा.त्याच्याकडे एकच चावी होती, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईक्स तो हेरायचा. आणि त्या एकाच चावीने तो बाईक्सचे लॉक उघडून, त्या चोरून पसार व्हायचा. असं करत त्याने तब्बल ८ बाईक्स चोरल्या. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आठही बाईक्स हस्तगत केल्या. पुढील चौकशीत चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.