राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षांमध्ये हडपसर विधानसभेमध्ये सरळ लढत होत असताना मनसेने येथे आव्हान उभे केले होते. अशातच आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे, अशी घोषणा केल्याने महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो अशी चर्चा सुरु आहे.
महादेव बाबर म्हणाले, शिवसैनिक व कार्यकर्ते यांचा आदेश मला महत्वाचा आहे. त्यांच्या आग्रहामुळेच मी हडपसर विधानसभा अपक्ष म्हणून लढवणार आहे. प्रामाणिकपणे काम करूही पक्ष साथ देत नसेल तर, मला माझ्या कार्यकत्यांचा अपमान करायचा नाही, आता बस्स झालं, अर्ज तयार आहे, लवकरच भरणार असल्याचे, माजी आमदार महादेव बाबर यांनी जाहीर केले आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुक उमेदवार महादेव बाबर यांनी नाराजी व्यक्त करत, आपले संपर्क कार्यालय कोंढवा खुर्द येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शिवसैनिक व कार्यकत्यांनी आग्रह केल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे बाबर यांनी जाहीर केले आहे.
१९८४ सालापासून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली शिवसेनेची ताकद वाढविण्याचे काम करीत आहे. तळागळात शिवसेना पोहचविली, अनेक घडामोडी घडल्या, पण शिवसेना सोडली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी लक्षात घेऊन, मित्र पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले. आता, आम्हाला संधी मिळणार या भावनेतून मतदार संघातील शिवसैनिक व कार्यकर्ते काम करत असताना यावेळी पुन्हा आम्हालाच डावलले गेले. या मतदार संघात विजय आपलाच असताना पक्षाकडून अशी डोळेझाक का? असा सवालही माजी आमदार महादेव बाबर यांनी उपस्थित केला आहे. या मेळाव्यास हडपसर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.