महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत अमित शाहांचे सूचक विधान म्हणाले, ‘महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीसांना..
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचारांचा धडाका सुरु झाला आहे. मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते मंडळी करत आहेत. पक्षांचे जाहीरनामे देखील प्रसिद्ध झाले असून सत्ता आल्यास महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू अशी आश्वासने दिली जात आहेत.
महायुतीचा प्रचार करण्यासाठी आज राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभा सुरु आहेत.पीएम मोदी यांची धुळे नंतर नाशिक येथे सभा झाली. तर अमित शाहांच्याही राज्यात आज चार ठिकाणी सभा होत आहेत. शिराळा (सांगली), कराड, सांगली, कोल्हापूर येथे सभा होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
अमित शाह म्हणाले, २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे. या विधानावरून अमित शाह यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केल्याची चर्चा सुरु झाली आहे. जर महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे बोलले जात आहे.