
मोठी बातमी! राज्यात भाजपाप्रणीत महायुती तुटली
स्वबळावर निवडणुका लढण्याची भाजपाची घोषणा, शिवसेना, राष्ट्रवादीची भूमिका ठरेना?
पिंपरी चिंचवड – विधानसभा निवडणूकीत महायुतीने ऎतिहासिक विजय मिळवला आहे. एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतील पक्ष त्यातही भाजपा स्वबळावर लढेल अशी शक्यता होती. पण आता महायुती तुटल्याची घोषणा भाजपा आमदाराने केली आहे.
लोकसभा आणि विधानसभेत असणारी महायुती पालिका निवडणुकीत तुटणार, हे आता भाजपा आमदाराच्या घोषणेने जवळपास निश्चितच झाले आहे. भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगताप यांनी महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या किती जागा लढवणार? या प्रश्नावरती बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, शंभर टक्के, सर्व जागा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लढणार आहे, लोकसभा आणि विधानसभेपर्यंत महायुती होती. पण स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याचे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले होते. मी ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतो, त्या पक्षाचे महानगपालिकेमध्ये आधीपेक्षा देखील आता जास्तीचे नगरसदस्य निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच जागा लढण्याची रणनीती आखली असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. आता भाजपाच्या या भुमिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सध्या शहरांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. ही बैठक भाजपाच्या माजी नगरसेवकांची होती मात्र बैठकीला राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित राहिल्यामुळे त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.