Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण

गणेशोत्सवादरम्यान डीजेचा वापर आणि वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे प्रसिद्ध अभ्यासक विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील टिळक रोड परिसरातील कशाळे चौकात गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी बापट यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नक्की काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोडवरील कशाळे चौक परिसरात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. त्यावेळी गणेशोत्सवातील डीजे आणि आवाजाच्या मर्यादेवरून तेथे उपस्थित गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे बापट यांना झालेल्या मारहाणीत झाले.

कोण आहेत विद्यानंद बापट?

विद्यानंद बापट हे पुण्यातील ध्वनीप्रदूषणविरोधी चळवळीशी संबंधित अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी सार्वजनिक उत्सवांमधील डीजेचा वाढता वापर, आवाजाच्या मर्यादा, नागरिकांचे आरोग्य आणि मूलभूत नागरी प्रश्न यावर सातत्याने परखड भूमिका मांडली आहे. अलीकडेच त्यांनी सण-उत्सवांचे अवडंबर, गावांची वा स्टेशनची नावे बदलणे आणि धर्मवादाचे राजकारण यावर भाष्य करत; सरकारने खड्डेमुक्त रस्ते, २४ तास पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यावर भर दिला पाहिजे, अशी रोखठोक भूमिका मांडली होती.

डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पुण्यातील गणेशोत्सवात दरवर्षी डीजेचा कर्णकर्कश आवाज, ध्वनीप्रदूषण आणि त्यातून ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना होणारा त्रास हा विषय अत्यंत संवेदनशील ठरतो. या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या अभ्यासकावरच अशा प्रकारे हल्ला झाल्यामुळे पुण्यातील सुजाण नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या मारहाणीप्रकरणी पोलीस ठाण्यात नेमकी कायदेशीर कारवाई झाली आहे का आणि गुन्हा कोणावर दाखल झाला आहे, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळणे अद्याप बाकी आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!