गावकऱ्यांनी खासदाराची केली डोके फुटेपर्यंत बेदम धुलाई
पोलीसांसमोरच खासदाराला पळवून पळवून मारले, खासदाराच्या धुलाईचा व्हिडीओ व्हायरल
पटना – बिहारमधील सासारामचे काँग्रेस खासदार मनोज राम यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. एका शाळेमुळे ही घटना घडली असून जमावाच्या आक्रमकतेमुळे खासदारांना चक्क घटनास्थळावरून पळ काढावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
बिहारमधील काँग्रेस खासदारावर जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. बिहारमधील सासारामचे खासदार मनोज राम यांना कैमूरच्या मोहनिया येथे हल्ला करण्यात आला. ही घटना त्यांच्याच भावाच्या सेंट जॉन इंटरनॅशनल शाळेजवळ घडली आहे. गावात एक मिरवणूक होती, यावेळी गावकरी आणि सेंट जॉन इंटरनॅशनल शाळेचा बस चालक यांच्यात वाद झाला. यावेळी वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराला जमावाने घेरले आणि त्यांना मारहाण करुन जखमी केले. यामध्ये खासदाराच्या डोक्याला दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे पोलीसांसमोरच हा प्रकार घडला. खासदार मनोज राम यांचे बंधू मृत्युंजय भारती यांनी हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, वाद मिटलेला असतानाही काही लोकांनी परत येऊन ही मारहाण केली आहे. सध्या खासदार रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडे घटनेचे व्हिडीओ फुटेजही हाती लागले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या तणावपुर्ण वातावरण असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसपींसह मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात आहे.