पुण्यात कमोडमध्ये डोके कोंबत तरुणीचा वृध्द महिलेवर जीवघेणा हल्ला
पुण्यात वृध्द महिलांची रेकी करत लुटणारी टोळी सक्रिय, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, तरुणांमुळे वाचली महिला
पुणे – पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता पुण्यात रेकी करत चोरी करणा-या युवतीला नागरिकांनी रंगेहाथ अटक केली आहे. पण या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यातील म्हाळुंगे पाडाळे गावातील एका बिल्डिंगमध्ये एक वयोवृद्ध महिलेची रेकी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एका तरूणीने वृद्ध महिलेसोबत बोलत ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला लिफ्टमध्ये जात असताना तरुणीदेखीक सोबत गेली, तसेच जबरदस्तीने महिलेच्या घरात प्रवेश केला. घरात शिरताच तरुणीने ओढणीच्या साह्याने महिलेचा गळा आवळून तिचे दागिने काढून घेतले. त्यानंतर धमकावत महिलेकडून आणखी दागिने आणि पैशांची मागणी केली. यावेळी महिला तिला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्या तरुणीने तिला ओढत टॉयलेट सीटपर्यंत घेऊन जात महिलेचे डोके टॉयलेट सीटच्या भांड्यात कोंबले आणि वरून पाणी सोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.यावेळी महिलेने खिडकीवर हात मारत मदतीसाठी आरडाओरडा केला. हा सर्व प्रकार घडत समोरच्या फ्लॅटमधील गॅलरीत उभ्या असलेल्या एका महिलेने पाहिला आणि तिने तिच्या मुलांना तत्काळ याची माहिती दिली. अखेर दोन तरुण काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दार तोडून वृद्ध महिलेचा जीव वाचवला. तसेच चोरीच्या उद्देशाने आलेल्या तरुणीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे.
ही धक्कादायक घटना ३१ जानेवारीला घडल्याचे सांगण्यात येत आहे. बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या, किंवा घरे फोडण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.