
पुण्यात ऑनलाइन ऑर्डरच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी
हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, नागरिक भयभीत
पुणे – पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याने गुन्हेगारीला ऊत आला आहे. चिंचवडमधील संत तुकाराम भागात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुरूवातीला वादावादी झाल्यानंतर अचानक हाणामारी सुरू झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक जण दुसऱ्याच्या अंगावर धावून जात चापट मारतो, त्यानंतर त्या तरुणाला इतरांनी मारहाण केली. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. एकाने भला मोठा सिमेंटचा गट्टू उचलून एकाच्या पाठीत घातला. दोन गटात हा वाद झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. ही हाणामारी ब्लिंकइट ऑनलाइन डिलिव्हरीच्या ऑर्डरवरून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल नसला तरी व्हिडिओच्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अशा घटना वाढत चालल्यामुळे नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.