
मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा
संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजीनामा, महायुतीची पहिली विकेट
मुंबई – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी व्हायरल झाले. यामुळे जनतेचा रोष पाहता धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ही महायुती सरकारची पहिलीच विकेट आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनजंय मुंडे यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले होते, त्यानंतर हा राजीनामा देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाईकरता राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून मुक्त करण्यात आलं आहे.” दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक सुरु होती, यातच राजीनामा घेण्याचा निर्णय झाला होता.
देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास उशीर झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.