
मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार
तारीख ठिकाण आणि वेळही ठरली. महापालिका निवडणूकासाठी दोन्ही पक्षात युती होणार?
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय होईल हे सांगता येत नाही. आता राज्याच्या राजकारणात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावे यासाठी आता मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत हा कार्यक्रम पार पडणार आहे. यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते. त्यानिमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवली आहे. ही निमंत्रण पत्रिका ठेवून बंधूत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. येत्या गुढीपाडव्याला हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं जाणार आहे. येत्या ३० तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मुंबईत होणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील खूप व्हायरल होत आहे. बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असे या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. मोहनिश रविंद्र राऊळ यांनी ही पत्रिका छापली आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका विवाहसमारंभात एकत्र दिसून आले होते. त्यांच्यात संवादही झाला होता. त्यामुळे ते एकत्र येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.