
भयंकर! मद्यधुंद तरुणाने भरधाव कारने नागरिकांना चिरडले
अपघाताचा व्हिडिओ व्हायरल, अपघातानंतरही तरूणाचा माज कायम, म्हणाला निकिता अनादर राऊंड...
वडोदरा – गुजरातच्या वडोदरामधून एक भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. वडोदऱ्यातील करेलीबाग परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे.
भरधाव कारने धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. ही घटना करेलीबाग परिसरात घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत अनेक वाहनांना धडक दिली. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघाताच्या वेळी गाडीचा वेग ताशी १०० किमीपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. हा अपघात जवळच्या आम्रपाली कॉम्प्लेक्सच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चालकाचे नाव रक्षित रवीश चौरसिया असे आहे. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरामधील करेलीबाग हा गजबजलेला परिसर आहे. या भागात एका काळ्या रंगाच्या भरधाव कारने तीन दुचाकींना चिरडले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झालेत. हेमालीबेन पटेल असे या महिलेचे नाव असून जैनी , निशाबेन, एक १० वर्षांचा मुलगा आणि आणखी एक ४० वर्षांची व्यक्ती जखमी झाली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की गाडीमधील एयर बॅग्सही उघडल्या आणि कारचाही चक्काचूर झाला. अपघात गेल्यानंतर अनेक लोक त्याठिकाणी जमा झाले तेंव्हा नशेत असणारा रक्षित ‘अनदर राऊंड, अनदर राऊंड, अनदर राऊंड निकिता’, असे जोरजोराने बोलत होता. त्याला पाहून जमाव आक्रमक झाल्यानंतर या तरुणाने ‘ओम नम: शिवाय’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यानंतर लोकांनी पकडून या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही गाडी रक्षितचा मित्र प्रांशू चौहान याच्या मालकीची होती.
पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरुवात झाली आहे. रक्षित चौरासियाने अंमली पदार्थांचे सेवन केले होते का, याची तपासणी पोलीस करत आहेत. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.