
महिलेने शिंदे गटाच्या नगरसेवकाला भररस्त्यात दिला चोप
मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, विनयभंग केल्याचा आरोप करत बेदम मारहाण
कल्याण – कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात सोमवारी शिंदे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या राणी दिलीप कपोते यांनी भर रस्त्यात शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना चोप दिला. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. श्रेयवादावरुन हा वाद झाल्याचे बोलले जात आहे.
कल्याणमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या श्रेयवादावरून पदाधिकाऱ्यांमध्ये नुकताच वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता. हा कार्यक्रम काल सायंकाळी होता. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता. त्याठिकाणी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्याठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते पोहचल्या. त्यांनी सांगितले की, या कामाचा पाठपुरावा मी केला आहे. त्यानंतर त्याठिकाणी जोरदार गोंधळ झाला. त्यावर माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा मी केला असल्याचा दावा केला होता. घटनेच्या दिवशी अहिल्या बाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले आमने सामने आले. राणी कपोते यांनी तू मला शिव्या का देतो माझ्यासोबत गैरवर्तन काय करतो. असं म्हणत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला. यात उगले यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिंदे गटातील हा वाद समोर आल्याने याची चर्चा होत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणूकीत याचा फटका बसण्याचंही बोलले जात आहे.
शिंदे सेनेतील वादामुळे भर रस्त्यावर झालेल्या या राड्याची कल्याणमध्ये जोरदार चर्चा होत आहे. या वादामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोरे यांनी कारवाईची मागणी केली आहे.