
अजित पवारांनी या विश्वासू नेत्याला दिले जिल्ह्याचे पालकमंत्रीपद
अजित पवारांचा मोठा निर्णय, पालकमंत्रिपदाचा मुद्दा निकाली, समीकरणे बदलणार?
मुंबई – मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडल्यानंतर वाशिमचे पालक मंत्रिपद कुणाला मिळणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर अजित पवार याबाबत निर्णय घेत आपल्या खास व्यक्तीकडे याची जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांना दिली आहे. मंत्रिमंडळात भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्रिपद नव्हतं. आता मात्र त्यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. महायुती सरकारमध्ये वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्या वाट्याला आले आहे. यानुसार या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी याआधी ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांची निवड केली होती. या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या निवडीची घोषणा केली होती. या निवडीत हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु मुश्रीफ यांनी वैयक्तिक कारण देत, या पालकमंत्रीपदाचा निवडीनंतर महिनाभरातच राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले आहेत. पालकमंत्री पदाची धुरा सांभाळताना वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण, समतोल विकास साधणार अशी प्रतिक्रिया मंत्री भरणे यांनी दिली आहे. भरणे हे अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. शासनाकडून त्यांच्यावर पुन्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी टाकण्यात आल्याने हा विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सन २०२४ मध्ये दत्तात्रेय भरणे हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. शिवाय त्यांनी काही काळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे.