
बारामतीत तरूणाला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, पोलीसांकडुन तपास सुरु, म्हणून तक्रार देण्यास तरूणाचा नकार...
बारामती – बारामती शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये एका युवकाला दोन ते तीन जणांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
बारामतीत भर दिवसा मारहाण केल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्या तरुणाला मारहाण झाली, त्याने भीतीने तक्रार दाखल केलेली नाही. मारहाण करणारे युवक इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे मारहाण नेमकी कशामुळे झाली, याबाबत अस्पष्टता आहे. व्हिडिओत दिसत आहे की, दोघेजण एका हाँटेलात जातात , आणि तिथे बसलेल्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात करतात एवढेच नाहीतर त्याला हाॅटेलमधून बाहेर ओढत रस्त्यावर घेत बेदम मारहाण केली आहे. मारहाण केल्यानंतर ते तिथून दुचाकीवर निघून जातात. हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत अमानुष मारहाण करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन पोलिसांनी संबंधित युवकांचा माग काढला असून पोलिस त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवित असल्याचेही राठोड यांनी सांगितले आहे, त्यानंतरच या मारहाणीबाबतचा खुलासा होणार आहे. दरम्यान असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना करत असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आग्रही असतात. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील तरूणाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.