
कुख्यात गुंड निलेश घायवळला कुस्ती स्पर्धेत मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, पुण्यात दबदबा पण पैलवानाने फटकारले, कोण आहे तो पैलवान?
धाराशिव – पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर धाराशिव जिल्ह्यातील एका गावच्या जत्रेत एका पैलवानाने हल्ला केला आहे. घायवळ आणि आयोजक हे आखाड्यात पैलवानांची भेट घेत असताना हा हल्ला झाला. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात निलेश घायवळ हा जत्रेनिमित्त आला होता. येथील ग्राम दैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता. याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी राज्यभरातून मल्ल उपस्थितीत होते. या जत्रेत भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात पैलवानांना भेटण्यासाठी गेला असता, अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. निलेश घायवळ हा फडातील पैलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश घायवळ याला मारहाण केली होती. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करुन गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, सागर मोहळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. निलेश घायवळ याच्या अंगावर पैलवान धावून आला तेव्हा तो आणि आयोजक हे आखाड्यात पैलवानांची भेट घेत होते. यावेळी प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत संबंधित पैलवानाने हल्ला केला. या घटनेमुळे कु्स्ती स्पर्धेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घायवळवर यापूर्वी मोक्का, खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.