
आठवीतील मुलाला रिंगण करत बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण
भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल, वसतिगृहात रँगींग? शाळेत नेमकं चाललयं काय?
अ. नगर – अहिल्यानगरच्या जामखेड येथील एका निवासी शाळेच्या वसतीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांनी आठवीतील मुलाला ही मारहाण केली आहे. एकप्रकारे रँगींगसारखा हा प्रकार आहे. हा व्हिडिओ समोर आल्याने वसतीगृहातील प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार घडत असताना वसतिगृह व्यवस्थापन काय करत होते, असा सवाल उपस्थित होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एका लहान मुलाला रिंगण करून बेल्टने मारहाण करण्यात आली आणि या मारण्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. संबंधित घटना सोमवारी घडल्याची माहिती आहे. दीपक केदार यांनी या घटनेवरून काही प्रश्न उपस्थित करत सरकारला सवाल केला आहे. “मुलांच्या रूममध्ये काय चाललंय, याकडे कुणाचं लक्ष नाही. मुले ओरडत असतानाही त्यांचा आवाज कोणाला ऐकू येत नाही. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा यातून दिसतो. मुख्याध्यापक आणि शिक्षक मुलांकडे लक्ष देत नाहीत. वॉर्डन कुठे आहे? त्यांच्याकडून कोणतीही देखरेख नाही”, असं दीपक केदार यांनी म्हटलं आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांना विद्यार्थ्यांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान याबाबत पोलिसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.