
..तर आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुरंगात असले असते
या खासदाराचा मोठा गाैप्यस्फोट, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत केला धक्कादायक दावा, पवारांचाबद्दल म्हणाले...
मुंबई – एकेकाळी एकत्र असणारे ठाकरे आणि भाजपा आता कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत विरोधकांना आव्हान देत असतात. आता राऊत यांनी लिहिलेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात धक्कादायक खुलासे केले आहेत. पण यामुळे भाजपा आणि ठाकरे गटात पुन्हा एका राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आर्थर रोड कारागृहात असताना राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी मोदी आणि शहांबाबत मोठा खुलासा केला आहे. पुस्तकात राऊत दावा करतात की, गुजरातच्या २००२ च्या दंगलीनंतर अमित शाह अडचणीत सापडले होते. सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला होता, आणि तडीपारीची कारवाई झाली होती. शाह यांना फक्त एकच व्यक्ती वाचवू शकते, आणि ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. एका दुपारी शाह आपला मुलगा जय शाह यांच्यासोबत, मुंबई विमानतळावर उतरले आणि थेट मातोश्रीकडे निघाले. मात्र, मातोश्रीच्या सुरक्षेमुळे त्यांना गेटवरच अडवण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करून शाह बाळासाहेबांना भेटले. शाह यांनी बाळासाहेबांना गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगत असल्याची दर्दभरी कहाणी सांगितली. “तुम्ही बोललात, तर न्यायमूर्ती तुमचं ऐकतील,” असं शाह म्हणाले. बाळासाहेबांनी चिरूटाचा झुरका घेत, मनोहर जोशी यांच्या फोनवरून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला आणि म्हणाले, “तुम्ही कोणत्याही पदावर असाल, पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका.” या एका फोनमुळे शाह यांच्या राजकीय आणि वैयक्तिक अडचणी दूर झाल्या, असा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान राऊत यांनी पुस्तकात दावा केला आहे की, गुजरात दंगलीदरम्यान संपूर्ण देश मोदींविरोधात असताना शिवसेना आणि ‘सामना’ त्यांच्या पाठीशी उभे राहिले. बाळासाहेबांनी चौकटीबाहेर जाऊन शाह यांना मदत केली. परंतु, याच मोदी आणि शाह यांनी पुढे शिवसेनेची “असुरी पद्धतीने” फोडल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
गुजरात दंगलीदरम्यान नरेंद्र मोदी तत्कालीन मुख्यमंत्री होते, आणि केंद्रातील यूपीए सरकार त्यांच्याविरोधात होते. सीबीआय चौकशीची टांगती तलवार मोदींवर होती, आणि त्यांना अटक होण्याची शक्यता होती. यावेळी शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये परखड मत मांडले की, “लोकशाहीत निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे योग्य नाही.” या भूमिकेला मूक संमती मिळाली, आणि मोदींची अटक टळली, असा दावा संजय राऊत यांनी पुस्तकात केला आहे.