
‘या’ मा. आमदारांचा लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश
पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली, महापालिका निवडणूकीसमोर काँग्रेसला झटका, भाजपा नाराज?
सोलापूर – विधानसभा निवडणूकीतील सुमार कामगिरीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांना लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. पण आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण एका माजी आमदाराने पक्षाला सोडचिठठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, ३१ मे रोजी अक्कलकोट येथे शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. सिद्धाराम म्हेत्रे हे अक्कलकोट मतदारसंघातून चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले आहेत. त्यांच्या वडिलांपासून घराणं काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलं असून, सुशीलकुमार शिंदे यांचे ते जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्षामुळे म्हेत्रे नाराज होते. कांग्रेस पक्षावर वा नेत्यांवर नाराज नाही. मात्र आपल्या अडचणीच्या काळात आपणास पक्षाकडून ताकद मिळाली नाही. भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना त्यांच्या पक्षाने जशी ताकद दिली, तशी ताकद २००९ नंतर पडत्या काळात काँग्रेस पक्षाकडून मिळाली नसल्याची खंत म्हेत्रे यांनी व्यक्त केली आहे. माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या निर्णयाने सोलापूरातील काँगेसला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची मोठी शक्यता आहे.
यापूर्वी दोनवेळा विधानसभा निवडणुकीत म्हेत्रे यांचा ४० हजार ते ५० हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून भवितव्य नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी हिंदुत्ववादी विचार स्वीकारून शिवसेना शिंदे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असावा. तसे असेल तर त्यांचे स्वागत आहे, अशी खोचक टिका आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली आहे.