
‘तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन’
शशांक हगवणेची वैष्णवीला धमकी, धक्कादायक चॅट उघड, प्रेमविवाहाला धमकीचा अँगल, पोस्ट माॅर्टम अहवालही धक्कादायक
पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. तिच्या वडिलांनी शशांक हगवणे याच्याशी लग्नाला विरोध केला होता, कारण हगवणे कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांच्या लक्षात आली होती.
वैष्णवीला इतर दोन स्थळं आलेली असतानाही, शशांकने त्या दोघांनाही धमकावल्याची माहिती समोर आली आहे. त्याने थेट फोन करून, “मी आणि वैष्णवी प्रेमविवाह करणार आहोत, त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका,” अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर “तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन”, “तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती. जी तिच्या मोबाईलवरील काही चॅट्स व कॉल रेकॉर्डिंग्समध्ये असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या असून, त्यापैकी १५ जखमा मृत्यूपूर्वीच्या २४ तासांत झाल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी शशांक हगवणे, त्याची सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. त्यांची पोलिस कोठडी २८ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी हगवणे कुटुंबियांच्या घरातून पहार, साडी, स्टूल, वैष्णवी यांचा मोबाईल, घरातील सीसीटीव्हीचे व्हिडिओ तसेच हुंड्यात मिळालेली एक दुचाकी, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी, दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. तसेच पाचही आरोपीची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. हुंड्यामध्ये मिळालेले ५१ तोळे सोने आरोपींनी एका बँकेत तारण ठेवले आहे. ते कोणत्या कारणासाठी ठेवले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबीयांनी ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्यूनर कार असा हुंडा तर घेतलाच होता. त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्चही करायला लावला. वैष्णवीच्या आणि शशांकच्या लग्नाची परिसरात खूप चर्चा झाली होती.
हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. वैष्णवी हगवणे हिचा सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, पती शशांक हगवणे यांच्यासह सासू आणि नणंदेकडून मानसिक, शारिरिक छळ केला जात होता. माहेरातून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण करण्यात येत होती. याच मारहाणीला, त्रासाला कंटाळून वैष्णवीने आपले आयुष्य संपवले.