
पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांना घडवली अद्दल
पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, नशेत पोलीसावर केला हल्ला पण....
इथानगर – पोलीस काॅन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या युवकांनी भररस्त्यात चोप देत चांगलीच अद्दल घडवली आहे. आंध्र प्रदेशमधील इथानगर भागात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल कन्ना चिरंजीवी यांच्यावर गांजाच्या नशेत काही जणांनी हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी रविवारी आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पोलिसांनी या तिघांना रस्त्यावर बसवून लाठीने मारहाण केली. पोलिसांनी त्या तिघांना जमिनीवर बसवले अन् एका पोलिस अधिकाऱ्याने आरोपींच्या पायावर काठीने दणके दिले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. चेब्रोलू जॉन व्हिक्टर, शेख बाबूलाल, आणि डोमा राकेश अशी आरोपींची नावे असून ती एका गुन्हेगारी टोळीचे सदस्य आहेत. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींचा गुन्हेगारी इतिहास आहे. व्हिक्टरवर नऊ गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. तर, राकेशवर सहा प्रलंबित खटले आहेत, ज्यामध्ये अशाच प्रकारचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या कारवाईचे समर्थन केले आहे तर काहींनी या कारवाईचा निषेध केला आहे. आरोपींना धडा शिकवण्यासाठी केलेल्या या कारवाईची सध्या आंध्रामध्ये जोरदार चर्चा होत आहे.
या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत वायएसआर काँग्रेसचे नेते अंबाती रामबाबू यांनी राज्यातील सत्ताधारी चंद्राबाबू सरकारवर निशाणा साधला. सध्या राज्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.