
धनंजय मुंडे आमदारकीचा राजीनामा देणार?
मागील आठवडाभरापासून मुंडे 'या' ठिकाणी, बैठका आणि सार्वजनिक जीवनापासून लांब, दादासोबत मतभेद?
नाशिक – संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागणारे धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी संपण्याचे नाव घेत नाही आहेत. त्यांच्यावरील आरोपाची मालिका अजूनही थांबत नाही आहेत. त्यातच धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून धनंजय मुंडे मिडिया आणि बैठका यापासून लांब आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिकरीत्या फारसे सक्रिय दिसत नाहीत. आता धनंजय मुंडे गेल्या आठ दिवसापासून विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. १० दिवस ते ध्यानसाधनेत मग्न असून,ते दोन जूनपासून पुन्हा कामकाजात सक्रिय होणार आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांनी सध्याच्या त्यांच्या वास्तव्यासंदर्भातील माहिती गोपनीय ठेवली होती. मात्र,आता ते नाशिकमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणाबाबत आरोप करण्यात आले. यानंतर करुणा शर्मा यांच्याकडून होणारे वैयक्तिक आरोप, मंत्रीपदातील कमी झालेला वावर अन् त्यानंतर गेलेल मंत्रीपद यानंतर धनंजय मुंडे यांनी आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांना बेल्स पाल्सी या दुर्मिळ आजाराने ग्रासले. विविध उपचार घेऊनही अद्याप धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत हवी तितकी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांनी आता मनःशांतीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान संतोष देशमुख प्रकरण शांत झाल्यानंतर गेलेले मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा धनंजय मुंडे बाळगून होते. परंतु मुंडे यांच्याकडे असलेले मंत्री पद आणि अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवल्यानंतर ते कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते, त्यामुळे देखील धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या बैठकांना दांडी मारल्याची चर्चा आहे. एकूणच आपले राजकीय खच्चीकरण केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आता काही दिवस या सगळ्या वाद आणि वातावरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार मुंडे यांनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात आठवडाभरापुर्वी नाव नोंदणी करून ते तिथे दाखल झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
मागील साधारण सहा महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या भोवती विणले गेलेले आरोपांचे जाळे, मीडिया ट्रायल यांसह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विपशनेनंतर नवीन धनंजय मुंडे पाहायला मिळतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.