
आमचे नक्षल्यांशी संबंध तुमच्या कुटुंबाला ठार करू
विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, कपड्यानिशी घराबाहेर काढले, पोलीसांकडे गेल्यास ठार मारण्याची धमकी
नागपूर – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच राज्यभरातून अनेक महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. आता राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये देखील एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ होत असल्याची माहीती समोर आली आहे.
भंडारा येथील प्रतिक तांबोळी यांची मानस कन्या वैभवी हिचा विवाह नागपूर येथील अभिषेक उर्फ घुनेश्वर डेकाटे याच्यासोबत १९ जानेवारीला झाला होता. पण लग्नाच्या काही दिवसांतच पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी आणि नणंद नंदिनी यांनी वैभवीवर ५ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तगादा सुरू केला. हुंड्यासाठी तिचा सतत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. हुंडा न मिळाल्यामुळे वैभवीला २० मार्चला सासरून अंगावरील कपड्यांसह घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूरला गेले असता, सासरच्यांनी ‘५ लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलीला घेऊन जा’ असं स्पष्ट सांगण्यात आले. एवढेच नाहीतर ‘आमचे नक्षल्यांशी संबंध आहेत, पोलिसात गेला तर तुमच्या कुटुंबाला ठार करू’ अशीही धमकीही दिली गेली. या सगळ्या प्रकारानंतर वैभवीचे वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा राजेंद्र आणि नणंद नंदिनी यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर अनेक हुंडाबळीच्या घटना समोर आल्या आहेत. त्या थांबत नाहीत तोच हुंड्यासाठी छळ होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नक्षलवादाचा उल्लेख झाल्याने याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर आहे.