
धक्कादायक! पुण्यात भरधाव कारने तरुणीला चिरडले
झाड आणि कारमध्ये सापडून तरूणीचा मृत्यू, चालकाचा अटक, श्रेयाची चूक काय?
पुणे – पुण्यात सुरु असलेले अपघाताचे चक्र थांबण्याचे नाव घेत नाही. गंगाधाम, नवले पुल येथे लागोपाठ अपघात झाल्यानंतर आता कात्रजमधील सुखसागर भागात एका पादचारी तरुणीला मोटरीने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे रस्ते सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.
श्रेया गौतम येवले असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसला. यावेळी कार नारळाच्या झाडाला धडकून समोर असलेल्या बदामाच्या झाडात अडकली. झाड आणि कारच्या मध्ये सापडून श्रेयाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ, बिबवेवाडी आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. चालक सतीश होनमाने याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील चांदणी चौक, जो सततच्या वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो, याठिकाणी देखील गुरुवारी रात्री एक भीषण अपघात झाला. एका मालवाहू ट्रकच्या चालकाने समोर अचानक आलेल्या वाहनाला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावला या घटनेत, ट्रकच्या ट्रॉलीमध्ये भरलेल्या लोखंडी सळ्या केबिनमध्ये घुसल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत असल्याने पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करून संताप व्यक्त केला. वाहनचालकावर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे. नुकताच गंगाधाम चौकात एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा कात्रजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झाला आहे.