
रुपाली चाकणकर यांचा नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीच्या वापराबाबत कडक इशारा; परवानगीशिवाय वापर केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा!
पुणे | प्रतिनिधी : माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख तसेच स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट शैली यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आली असल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, छायाचित्र, ओळख किंवा वैयक्तिक शैलीचा व्यावसायिक अथवा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशनल व्हिडिओ किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील साहित्य तयार करणे, वापरणे अथवा प्रसिद्ध करण्यासाठी माझ्या ओळखीचा परवानगीशिवाय वापर केल्यास संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अशा प्रकारचे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी करण्यात येईल. संबंधित व्यक्तींना दिवाणी तसेच फौजदारी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या या इशाऱ्यामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर त्यांच्या नावाचा, फोटोचा व वैयक्तिक शैलीचा वापर करणाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.


