
ठरल तर! ‘हा’ नेता होणार भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष
भाजपाच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित, या तारखेला होणार नावाची घोषणा, आरएसएसचीही संमती?
दिल्ली – भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे. ‘संघ परिवार’मधून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जागी येत्या काही आठवड्यांत नवीन अध्यक्षांची निवड लवकरच होऊ शकते. तसेच अध्यक्षपदासाठी नाव देखील निश्चित झाले आहे.
भाजपच्या घटनेनुसार किमान अर्ध्या राज्यांमध्ये अध्यक्षांची निवड झाल्यावरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाऊ शकतात. १४ राज्यांमध्ये निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. राज्य शाखांच्या मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच हे नाव उघड केले जाईल. नड्डा यांनी अध्यक्ष म्हणून त्यांचा विस्तारित कार्यकाळ संपल्यानंतर जवळजवळ एक वर्ष हे पद सांभाळले आहे. संभाव्य अध्यक्षपदासाठी तीन नावांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ऊर्जा व नगरविकासमंत्री मनोहरलाल खट्टर, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी प्रधान यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. ४ ते ६ जुलै दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या प्रांत प्रचारक बैठकीनंतर अध्यक्षपदाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपकडून २१ जुलै २०२५ अगोदरच नव्या अध्यक्षाची घोषणा केली जाईल. काही राज्यांतील संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ही नियुक्ती निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपला नवीन अध्यक्ष मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नवीन अध्यक्षाच्या नेतृत्वात २०२९ मधील लोकसभा निवडणूक लढली जाणार आहे. त्याआधी पश्चिम बंगालचा अवघड पेपर देखील नवीन अध्यक्षांना सोडवावे लागेल.
धर्मेंद्र प्रधान हे सध्या केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. त्यांनी याआधी पेट्रोलियम, इस्पात व इतर खाती सांभाळली असून संघ आणि भाजप या दोघांच्या विश्वासातले प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. प्रचारक म्हणून त्यांनी संघाशी जुडलेली कामगिरीही बजावलेली आहे.