
भाजपाच्या ‘या’ आक्रमक हिंदुत्ववादी आमदाराचा राजीनामा
पक्षाच्या राज्य नेतृत्वावर जोरदार टिका करत राजीनामा, प्रदेशाध्यावर व्यक्त केली नाराजी, भाजपाला जोरदार धक्का?
हैद्राबाद – भारतीय जनता पक्षाला तेलंगणात सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे.
टी राजा सिंह यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. टी राजा सिंह हे गोशामहाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.तेलंगाणात भाजपने प्रदेशाध्यक्ष पदावर एन. रामचंद्र राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. टी राजा सिंह या निर्णयामुळं नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. टी राजा सिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना म्हटलं की लाखो कार्यकर्त्यांचा आवाज असून हा निर्णय वेदनादायी असूनही आवश्यक होता. एन. रामचंद्र राव यांच्या नियुक्तीनं पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये निराशा पसरली आहे. केंद्रीय नेतृ्त्वाची दिशाभूल करुन हा निर्णय घेतला गेला आहे. वैयक्तिक स्वार्थानं ते प्रेरित आहेत, असं टी राजा सिंह म्हणाले आहेत. राजा सिंह यांनी भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असेल तरी हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी असलेलं बांधिलकी कायम जपणार असल्याचं म्हटलं. धर्माची सेवा देखील बदलणार नाही. हिंदू समुदायाचा आवाज उठवणं त्यासाठी उभं राहणं मोठ्या ताकदीनं सुरु ठेवणार असं टी राजा सिंह म्हणाले आहेत. मी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाला – माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह आणि बीएल संतोष जी यांनाही नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा. तेलंगणा भाजपसाठी तयार आहे, पण आपण त्या संधीचा सन्मान करण्यासाठी योग्य नेतृत्व निवडले पाहिजे आणि ती संधी हातून जाऊ देऊ नये,” असेही राजा सिंह म्हणाले आहेत. टी. राजा सिंह हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांचा या निर्णयाने मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
टी राजा सिंह हे भाजपमध्ये आमदार असून ते नेहमीच आक्रमकपणे हिंदुत्वाची बाजू मांडताना पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रात देखील त्यांच्या भाषणाचं आयोजन अनेकदा करण्यात आलं होतं. टी राजा सिंह यांनी यापूर्वी २०१८ मध्ये देखील भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, पक्षानं तो राजीनामा स्वीकारला नव्हता. आता यावेळेस पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.