
भारताच्या स्टार क्रिकेटरला पत्नीमुळे न्यायालयाचा जोरदार दणका
बायको आणि मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार इतके लाख, सात वर्षापासूनचे कर्जही भरावे लागणार
कोलकत्ता – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सात वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. दरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणात निर्णय देत असताना पत्नी हसीन जहाँ आणि मुलीला दरमहा देखभाल खर्च म्हणून मोठी रक्कम देण्याचा निर्णय दिला. हा मोहम्मद शामीसाठी मोठा झटका आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार मुखर्जी यांच्या खंडपीठाने हसीन जहाँ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. पत्नी हसीन जहाँसाठी दरमहा दीड लाख रुपये तर अल्पवयीन मुलीसाठी दरमहा अडीच लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये दरमहा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. २०१८ साली अलीपूर सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात पत्नी हसीन जहाँला दरमहा ५०,००० आणि मुलीला ८०,००० देण्याचे निर्देश दिले होते. या निकालाविरोधात हसीन जहाँने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पत्नी हसीन जहाँने स्वतःसाठी ७ लाख रुपये आणि मुलीसाठी ३ लाख रुपये दरमहा भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. २०२१ साली मोहम्मद शमीने प्राप्तीकर भरल्यानुसार त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ७.१९ कोटी रुपये किंवा दरमहा ६० लाख रुपये आहे. तसेच हसीन जहाँने दावा केला की, तिच्या मुलीसह त्यांचा एकत्रित खर्च दरमहा ६ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. या तपशीलाचा विचार करून उच्च न्यायालयाने हसीन जहाँच्या बाजूने निकाल दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने असेही नमूद केले की, शमी त्याच्या मुलीसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक शैक्षणिक किंवा इतर खर्च स्वेच्छेने करू शकतो. दरम्यान २०२३ मध्ये पत्नीला ५० हजार रुपये आणि मुलीला ८० हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते. पण या निर्णयाविरोधात हसीन जहाँने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिने न्यायालयात स्वत:ला ७ लाख आणि मुलीसाठी ३ लाख रुपये दरमहा खर्चाला द्यावे अशी मागणी केली होती. आता शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला, दरमहा १.५ लाख रुपयांप्रमाणे सात वर्षांचे १ कोटी २६ लाख रुपयेही द्यावे लागतील. तर, मुलगी आयरालाही २.५ लाख रुपये महिन्याच्या हिशेबाने, २ कोटी १० लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांनी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. तर २०१५ मध्ये त्यांना मुलगी झाली. मोहम्मद शमीची मुलगी सध्या दहा वर्षांची आहे. हसीन जहाँने २०१८ मध्ये शमीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात आहे. शमीसोबत लग्न करण्याआधी हसीन जहाँने केकेआरसाठी मॉडेल आणि चीअरलीडर म्हणून काम करत होती.