
मुंबई महापालिका कोण जिंकणार? नवीन पोल समोर
दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास भाजपा आणि शिंदे गटाच्या अडचणी वाढणार? हा पक्ष जिंकणार जास्त जागा?, पहा आकडेवारी
मुंबई – महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. सर्व पक्षांनी त्यासाठी तयारी सुरु केली आहे. पण सगळ्यांचे लक्ष श्रीमंत मुंबई महापालिकेकडे आहे. दोन्ही शिवसेना आणि भाजप यांच्यात त्यासाठी स्पर्धा आहे. पण एक नवीन अंदाज समोर आल्याने महायुतीची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाप्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीचे पाणिपत झाले. पण आता महापालिका निवडणूका जवळ आल्या आहेत. त्या निवडणूकीसाठी महायुतीत पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे भाजपासमोर मुंबई महापालिका जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपाचा महापाैर बसवण्याचे स्वप्न आहे. पण अगोदर शिवसेना आणि आता शिवसेना मनसे युती यामुळे त्याला खो बसण्याची शक्यता आहे. एका नवीन सर्वेक्षणानुसार जागांबाबत नवीन माहिती समोर आली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र लढल्यास त्यांना ११८ जागा जिंकता येतील. तर भाजपा ६४ जागा जिंकू शकतो. तर काँग्रेसला २५ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर २० जागांवर इतर पक्ष बाजी मारु शकतात. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला जोरदार धक्के दिले असले तरी मुंबईत मात्र ठाकरेंनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत ठाकरे गटाला २३.२ टक्के मते मिळाली होती तर शिंदे गटाला फक्त १७.७ टक्के मते मिळाली होती. ठाकरेंचे मुंबईत १० आमदार आणि ३ खासदार आहेत तर शिंदेचे ६ आमदार आणि १ खासदार आहे. त्यामुळे मुंबईत दोन ठाकरे एकत्र आल्यास शिंदे गटाला विजयापेक्षा आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे. मनसेला विधानसभा निवडणुकीत मुंबईत ७.१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येणे भाजप शिंदे गटबरोबरच काँग्रेससाठी देखील राजकीय अडचणीचे ठरणार आहे.
मुंबईत सगळ्या पक्षांनी २०१७ मध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. त्या निवडणुकीत शिवसेनेनं ८६, भाजपनं ८४, काँग्रेसनं ३१, मनसेनं ७, एकसंध राष्ट्रवादीनं ९ आणि अन्य पक्ष आणि अपक्षांनी १२ जागा जिंकल्या होत्या.