
घरात कोणीही सिंह असतो महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारु
राज आणि उद्धव ठाकरे यांना भाजपा खासदाराची धमकी, महाराष्ट्राबद्दलही ओकली गरळ, दिले हे आव्हान
रांची – मराठी मुद्द्यावर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रविरोधात गरळ ओकली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून भाजपाची मोठी अडचण झाली आहे.
राज ठाकरे यांच्या ‘मारा पण व्हिडिओ बनवू नका’ या वक्तव्यावरही दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. जर तुम्ही इतके धाडसी असाल आणि हिंदी बोलणाऱ्यांना माराल तर तुम्ही उर्दू, तमिळ आणि तेलुगू बोलणाऱ्या सर्वांना मारावे. जर तुम्ही इतके मोठे ‘बॉस’ असाल तर महाराष्ट्रातून बाहेर पडा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या स्वत:च्या घरात सगळेच राजे असतात. राज आणि उद्धव ठाकरे यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशात येऊन दाखवावं, तिकडे त्यांना उचलून आपटतील. आम्ही मराठीचा सन्मान करतो पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही, असे निशिकांत दुबे यांनी म्हंटले आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आणि सलाउद्दीन, मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केला. दुसऱ्याने हिंदी असल्यामुळे अत्याचार केला, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर तुम्ही लोक आमच्या पैशावर जगत आहात. तुमचे उद्योग कोणते आहेत? तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल, पण, त्यांचा कोणताही काऱखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं. टाटा, बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात. पण, टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो, तुम्ही कोणता टँक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खजिनाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे. मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता अशा शब्दात दुबे यांनी गरळ ओकली आहे.
दुबे हे वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्याशी मुंबईतील हिंदी भाषिकांची तुलना केली होती. दरम्यान मराठी भाषा न वापरणाऱ्या मीरारोड येथील एका परप्रांतीय दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यापासून राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वादाचा भडका उडाला आहे.