
…म्हणून चार्जरने गळा आवळून केला केला बायकोचा खून
प्रेमविवाह केलेल्या जोडप्याचा दुर्देवी शेवट, पत्नीची हत्या, पतीचीही आत्महत्या, गोपाळ आणि गायत्रीमध्ये काय घडलं?
सोलापूर – सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार्जरच्या वायरने बायकोची हत्या करत नवऱ्याने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडली. विशेष म्हणजे दोघांनी प्रेमविवाह केला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गोपाळ लक्ष्मण गुंड आणि गायत्री गोपाळ गुंड अशी पती पत्नीची नावे आहेत. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी गोपाळ आणि गायत्री यांचा प्रेम विवाह झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ हा दूध व्यवसाय करीत होता. त्यातूनच सोलापुरात गायत्रीच्या घरी दूध देताना त्यांचे प्रेम जुळले. दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्यांचे घरच्यांनी संमती दिल्यानंतर तीर्थक्षेत्र आळंदी येथील देवस्थानात जाऊन लग्न केले होते. परंतु, अलीकडे दोघात बेबनाव झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात कुरबुर सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्ताने त्यांचे कुटुंबीय हे कीर्तनासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर कुटुंबियांना गायत्री आणि गोपाळ हे दोघे ही मृतावस्थेत आढळून आले. पती गोपाळने त्याची पत्नी गायत्री हिचा चार्जिंगच्या वायरने गळा आवळत खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गोपाळने असं टोकाचे पाऊल नेमकं का उचललं? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान गोपाळ आणि गायत्री यांचे मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि घटनेचा तपास सुरु केला. मात्र, या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.