
भयंकर! आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर बलात्कार
देवाच्या आळंदीत राक्षसी कृत्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिला किर्तनकार मास्टरमाईंड, पाच आरोपींना अटक
पुणे – आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात एक महिला किर्तनकारही आरोपी असून तिच्यासह पाच जणांवर बलात्कार, अपहऱण आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आळंदी शहरातील केळगाव रस्त्यावरील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या महिलेने तिला शेतात चल असे म्हणत बाहेर नेले. वाटेत एका काळ्या रंगाच्या गाडीत अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला बसवले. आरडाओरडा केल्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत नेण्यात आले. तेथे अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले. अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीने मोबाईल वरून पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधला. त्यानंतर आळंदी पोलीस तिथे पोहोचले आणि ही घटना समोर आली. मात्र त्यानंतर ७ जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन तिने फिर्याद दिली. त्यानुसार रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे यातील सुनिता आंधळे या कीर्तनकार असून त्यांना किर्तनासठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, गाडीचा चालक, सुनीता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर अपहरण, जबरदस्ती बलात्कार, धमकी देणे आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.